आज धाराशिव जिल्हा महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या नकाशावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे – देशातील तिसरा सर्वात मागास जिल्हा! केंद्र सरकारची ही घोषणा ऐकून ऊर अभिमानाने नाही, तर शरमेने भरून येतो. एकेकाळी मराठवाड्याचे भूषण असलेला हा जिल्हा विकासाच्या शर्यतीत इतका मागे का पडला? याला भौगोलिक परिस्थिती जबाबदार असली तरी, येथील गढूळ, स्वार्थी आणि कुरघोडीचे राजकारण हे त्याहून मोठे कारण आहे, हे आता लपून राहिलेले नाही. धाराशिवची सामान्य जनता आता उघडपणे म्हणू लागली आहे, “तुमचं राजकारण गेलं चुलीत, आम्हाला वेठीस धरू नका, विकासाच्या आड येऊ नका!” हा केवळ एक उद्वेग नाही, तर व्यवस्थेविरुद्धचा एक संतप्त आक्रोश आहे.
जवळपास ४० वर्षे डॉ. पदमसिंह पाटील यांची एकहाती सत्ता जिल्ह्याने अनुभवली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र, आमदार राणा जगजितसिंह पाटील, गेली २० वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. पिढ्यानपिढ्या सत्ता एकाच घरात, पण जिल्ह्याचे भाग्य मात्र अंधारातच! घरांचे टोलेजंग बंगले झाले, गल्ली-बोळांच्या सिमेंटच्या कॉलन्या झाल्या, पण धाराशिव जिल्हा मात्र एका वाढ खुंटलेल्या वृक्षासारखा तसाच राहिला. विकासाच्या नावावर केवळ आश्वासनांची खैरात वाटली गेली.
आमदार राणा पाटील यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवली, पराभव झाला. मग ‘विकास’ करण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तुळजापूरमधून निवडूनही आले, २०२४ मध्ये पुन्हा विजयी झाले. पण विकास नेमका कुठे आहे? तो फक्त चकचकीत फोटोशॉप आणि थ्रीडी व्हिडीओमध्येच दिसतोय का? कारण जमिनीवरची परिस्थिती भयावह आहे. शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तब्बल १४० कोटी रुपये केवळ रस्त्यांसाठी पडून आहेत, पण कामांना मुहूर्त लागेना! का? तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही, कथित राजकीय खेळात ही कामे अडकल्याचे बोलले जाते. इतकेच नाही, तर जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) तब्बल २६८ कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थगिती मिळाली. यामागेही आमदार राणा पाटील यांचेच राजकारण असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीच उघडपणे सांगितले आहे. सत्तेत राहून विकासासाठी निधी खेचून आणायचा की आलेला निधीही राजकीय स्वार्थासाठी थांबवायचा?
या साऱ्यामागे दडलंय ते चुलत बंधूंमधील टोकाचे राजकीय वैर. खासदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) आणि आमदार राणा पाटील (भाजप) यांच्यातील वैयक्तिक संघर्ष आता जिल्ह्याच्या विकासाला नख लावू लागला आहे. ओमराजे विरोधी पक्षात, तर राणा पाटील सत्तेत. पण ओमराजेंवर कुरघोडी करण्याच्या नादात, जिल्ह्याच्या विकासाचीच गाडी रुळावरून घसरत चालली आहे. केवळ विरोधकांवरच नव्हे, तर सत्तेतील मित्रपक्षांनाही ते जुमानत नसल्याचे चित्र आहे. महायुतीचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट) आणि माजी पालकमंत्री तानाजी सावंत (शिवसेना शिंदे गट) यांच्याशीही त्यांचे सख्य नव्हते, हे सर्वश्रुत आहे. हा विकासाचा अजेंडा आहे की केवळ स्वार्थाचा?
आमदार राणा पाटील यांना मंत्री होऊन जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे. पण ही अतृप्त इच्छा पूर्ण होत नसताना, संपूर्ण जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जिल्ह्याच्या भवितव्यापेक्षा मोठी झाली आहे का? ज्या जनतेने विकासाच्या आशेने तुम्हाला पुन्हा निवडून दिले, त्याच जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
धाराशिवची जनता आता जागी झाली आहे. त्यांना राजकीय कुरघोड्या नकोत, त्यांना हवा आहे विकास – चांगले रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार! नेत्यांच्या बंगल्यांची उंची वाढवण्यापेक्षा जिल्ह्याची उंची वाढवा, हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. पण नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि शह-काटशहाच्या राजकारणात सामान्य माणूस भरडला जात आहे.
धाराशिवच्या जनतेचा सवाल अगदी स्पष्ट आहे: कधी थांबणार हे स्वार्थी राजकारण? कधी मिळणार विकासाला गती? कधी फुटणार धाराशिवला विकासाची नवी पहाट? नेत्यांनो, आतातरी डोळे उघडा! जनतेचा अंत पाहू नका. त्यांचे म्हणणे ऐका – “तुमचं राजकारण चुलीत घाला, पण आमच्या विकासाच्या आड येऊ नका!” नाहीतर हाच मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी पुढची अनेक दशके संघर्ष करावा लागेल आणि त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह