धाराशिव: मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिव जिल्हा देशात तिसरा असला तरी अवैध धंद्यांच्या बाबतीत मात्र जिल्ह्याची नंबर एककडे वेगाने वाटचाल सुरू आहे. दारू, मटका, जुगार आणि गुटखा विक्रीच्या काळ्या बाजारात आता ‘लोकनाट्य’ आणि ‘तमाशा’ नावाच्या नव्या, चकचकीत व्यवसायाची भर पडली असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा गोरखधंदा फोफावत आहे.
बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने तुळजाई कला केंद्रातील गैरप्रकारांचे पितळ उघडे पाडले होते. तहसीलदारांनी कारवाई करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्राला स्थगिती दिल्याने या धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे, हे स्पष्ट झाले होते. मात्र आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे समोर आले आहे. जिल्ह्यात सध्या अशी सहा कलाकेंद्रे अधिकृतपणे सुरू असून, आणखी आठ केंद्रांना परवानगी मिळावी यासाठीचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, पूर्वी ज्या ‘मनोरंजना’साठी लोकांना सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब किंवा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडसारख्या ठिकाणी जावे लागत होते, ते ‘लोण’ आता थेट धाराशिव जिल्ह्यातच पोहोचले आहे. एकेकाळी मागासलेपणाची ओळख असलेल्या या जिल्ह्यात आता संस्कृतीच्या नावाखाली अवैध व्यवसायाची नवी बाजारपेठ उभी राहत आहे. बर्गे प्रकरणानंतरही प्रशासन सुस्त असून, एकापाठोपाठ एक अर्ज दाखल होत असल्याने विकासापेक्षा अवैध धंद्यांनाच प्रोत्साहन दिले जात आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
कलेच्या बुरख्याआड विनाश! धाराशिवमध्ये ‘नृतिकेच्या नादात’ अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त
धाराशिव जिल्ह्यात संस्कृतीच्या नावाखाली एक वेगळाच ‘विनाश’ सुरू आहे. लोकनाट्य कला केंद्रांच्या चकचकीत रोषणाईमागे अनेक संसार अंधारात जात असून, नर्तिकेच्या मोहात अडकून अनेक जण आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची आत्महत्या हे या भीषण वास्तवाचे केवळ एक टोक आहे; यामागे अनेकांच्या कर्जबाजारीपणाच्या, कौटुंबिक कलहाच्या आणि सामाजिक वाताहतीच्या हृदयद्रावक कहाण्या दडलेल्या आहेत.
अशी होते आयुष्याची राखरांगोळी
या कला केंद्रांमध्ये ‘लोककला’ केवळ नावापुरती उरली आहे. पारंपरिक वाद्यांऐवजी कानठळ्या बसवणारे डीजे , बेकायदेशीर दारूची विक्री आणि निर्धारित वेळेनंतरही चालणाऱ्या धांगडधिंगाण्याच्या आडून तरुणाईला आणि प्रौढांना व्यसनाच्या गर्तेत ढकलले जात आहे. सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून या ठिकाणी जाणारी पावले हळूहळू नर्तिकेच्या ‘नादी’ लागतात. त्यांच्यावर पैशांची उधळपट्टी सुरू होते, ज्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होते. बघता बघता डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो, घरात वादविवाद सुरू होतात आणि अनेकांचे व्यवसाय-नोकरी धोक्यात येतात.
गोविंद बर्गे, जे एक माजी उपसरपंच होते, ते या मोहिनीजालात कसे अडकले आणि त्याचा शेवट किती दुर्दैवी झाला, हे संपूर्ण राज्याने पाहिले, बर्गे हे या सामाजिक विनाशाचे प्रातिनिधिक उदाहरण असून, त्यांच्यासारखे अनेक जण आजही या चक्रात अडकलेले आहेत.
प्रशासनाचा आशीर्वाद की डोळेझाक?
हे सर्व सुरू असताना प्रशासन मात्र सुस्त आहे. वाशी पोलिसांनी तुळजाई कला केंद्रातील गैरप्रकारांचा स्वयंस्पष्ट अहवाल देऊनही, तहसीलदारांनी केलेली परवाना रद्दची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थगित केली. जिल्ह्यात सध्या सहा केंद्रे सुरू असून, आणखी आठ केंद्रांचे अर्ज प्रशासनाकडे मंजुरीसाठी पडून आहेत. पूर्वी ज्या ‘विनाशा’साठी लोकांना मोडलिंब, जामखेडला जावे लागत होते, तो आता जिल्ह्यातच घरोघरी पोहोचवण्याची सोय केली जात आहे का, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. जर वेळीच या केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या सामाजिक शोषणावर आवर घातला नाही, तर भविष्यात अनेक ‘गोविंद बर्गे’ तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही भीती आता अधोरेखित झाली आहे.