ढोकी : तिसरी बायको करण्यास का अडथळा आणतोस, या कारणावरून दोघा जणांनी मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना ढोकी येथील राजेशनगर भागात घडली. या मारहाणीत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या घरातील दोन महिलांनाही मारहाण करण्यात आली असून, यात एका महिलेचा हात फॅक्चर झाला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनिल उद्धव चव्हाण (वय ३५, रा. राजेशनगर, पारधी पिढी, ढोकी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अनिल चव्हाण आणि आरोपी दादा उद्धव चव्हाण व सुनील उद्धव चव्हाण हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी अनिल यांना “तू तिसरी बायको करण्यास का अडथळा आणतोस?” अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले.
हे भांडण सुरू असताना अनिल यांची पत्नी राणीबाई आणि अनुसया उर्फ चिंगीबाई या दोघी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत डाव्या हाताचा खांदा फॅक्चर होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच आरोपींनी सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
अनिल चव्हाण यांनी ३० डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात आरोपी दादा उद्धव चव्हाण आणि सुनील उद्धव चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.






