धाराशिव: यंदाच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्यात तब्बल ५० लक्ष वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, येत्या १९ जुलै रोजी एकाच दिवशी २० लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर, वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिमेच्या तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी सर्वश्री प्रवीण धरमकर, शिरीष यादव, उदयसिंह भोसले, संतोष राऊत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. करे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री श्याम गोडभरले, सूर्यकांत भुजबळ, देवदत्त गिरी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मोमीन आणि जलसंपदाचे कार्यकारी अभियंता श्री. मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठिकाण निश्चिती आणि पूर्वतयारीला वेग देण्याचे आवाहन
श्री. पुजार यांनी सांगितले की, येत्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी लागवडीची ठिकाणे तातडीने निश्चित करावीत. नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन संबंधित तालुका व शहरी यंत्रणांच्या बैठका घ्याव्यात व लागवडीपूर्व कामांना गती द्यावी. शहरी भागातील मोकळ्या जागा व शाळांच्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करून वृक्षारोपण करावे. तसेच, साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. १९ जुलै रोजी ६२ हेक्टर क्षेत्रावर २० लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लोकसहभाग आणि सहा महिन्यांनी आढावा
गावपातळीवर प्रत्येक गावातून किमान ३०० व्यक्ती या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच, या मोहिमेचा आढावा सहा महिन्यांनंतर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वृक्ष लागवड करताना कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत, याचेही अचूक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जलसंधारण आणि रस्ते विकासावरही भर
पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी साठवणूक करून भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’च्या धर्तीवर ‘जलतारा’ प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घेण्याचे निर्देशही श्री. पुजार यांनी दिले. शेतकऱ्यांना शेतात जाणे आणि शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे सोपे व्हावे, यासाठी अतिक्रमित रस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यासोबतच, पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची कामे वेगाने पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.
या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते, तर संबंधित यंत्रणांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते.