धाराशिव: येथील रखडलेल्या ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून २७६.२५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ही खास बाब म्हणून करण्यात आली असून, यामुळे आता धाराशिव शहरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासह जवळपास १००० खाटांची अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मित्र चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर झाले होते, परंतु त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने त्याचे काम रखडले होते. ही बाब आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
आशियाई विकास बँकेचा निधी प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्या संलग्न रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीच्या आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली होती. त्या बैठकीत, आमदार पाटील यांनी केलेल्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री महोदयांनी या नियमाला अपवाद करत खास बाब म्हणून धाराशिव जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयासाठी २७६.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत व रुग्णालयासाठी नुकतीच ४०४ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. ४३० खाटांच्या या अद्ययावत रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होऊन येत्या दोन वर्षांत ते सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने, आता वैद्यकीय महाविद्यालयाचे ४३० खाटांचे रुग्णालय, नवीन ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय आणि सद्यस्थितीतील ६० खाटांचे स्त्री रुग्णालय मिळून धाराशिव शहरात जवळपास १००० खाटांची सुसज्ज आरोग्य व्यवस्था निर्माण होणार आहे. याचा मोठा फायदा सामान्य नागरिकांसह वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. या मोठ्या क्षमतेच्या रुग्णालयांच्या आधारे भविष्यात वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर (PG) शिक्षणाचे कोर्सेस सुरू करण्याचा मानसही आमदार पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.