धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोरी, लूटमार आणि घरफोडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांमध्ये लाखो रुपयांच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये वाहने, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि औद्योगिक साहित्याचा समावेश आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातून डिझायर कारची चोरी
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मुज्जमील अहेमद काझी (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराजवळ लावलेली ८०,००० रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (क्र. एमएच ०१ सी.जे. ४४३०) अज्ञात चोराने चोरून नेली. याप्रकरणी २३ जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंबमध्ये वाहनचोरी आणि मंगळसूत्र लंपास
कळंब पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या संगिता संतोष शिंदे (वय ४३) या २१ जुलै रोजी कळंब बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोराने त्यांच्या गळ्यातील १,०८,५७० रुपये किमतीचे २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरले.
दुसऱ्या घटनेत, डिकसळ येथील प्रदीप श्रावण गायकवाड (वय २७) यांची ३०,००० रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच २५ बी.ई. १९०८) घरासमोरून चोरीला गेली. दोन्ही गुन्हे २३ जुलै रोजी दाखल झाले आहेत.
उमरग्यात महिला प्रवाशांना लुटले
उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस प्रवासादरम्यान महिलांना लक्ष्य करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. बाभळसूर येथील मिनाक्षी रावसाहेब सूर्यवंशी (वय ६०) यांची बॅगेतील ३५,००० रुपयांची रोकड २२ जुलै रोजी प्रवासादरम्यान चोरण्यात आली.
दुसऱ्या घटनेत, बलसुर येथील सत्यशीला बालाजी हाडोळे (वय ३५) या उमरगा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील १८,००० रुपये किमतीचा ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अज्ञात व्यक्तीने चोरला.
वाशीत लाखो रुपयांच्या विद्युत तारेची चोरी
वाशी पोलीस ठाण्यात एक मोठी चोरीची घटना नोंदवली गेली आहे. गोजवाडा शिवारात ‘एक टेक सोल्युशन पुणे’ कंपनीची ४,९५,००० रुपये किमतीची सुमारे ३,७०० मीटर लांबीची ॲल्युमिनियमची विद्युत तार (AL-59 ECO PANTHER CONDUCTOR) अज्ञात चोरांनी चोरून नेली. ही घटना २६ ते २७ जून दरम्यान घडली असून, श्रीकृष्ण बाबासाहेब विधाते यांनी २३ जुलै रोजी फिर्याद दिली आहे.
तुळजापुरात चाकूचा धाक दाखवून लूटमार
तुळजापूर येथे एका धक्कादायक घटनेत, लक्ष्मण सोनाप्पा जेटीथोर (वय २६) आणि त्यांच्या मित्राला दोन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून लुटले. आरोपी विजय भोसले आणि त्याच्या साथीदाराने २२ जुलै रोजी घाटशीळ स्मशानभूमीजवळ दोघांकडून मोबाईल फोन, ५,६०० रुपये रोख आणि सोन्याची अंगठी असा एकूण ५०,६०० रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि तुळजापूर येथील घटनेत कलम ३(५) अन्वये गुन्हे दाखल केले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाल्याने पोलीस यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे.