धाराशिव: जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून, अज्ञात चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. येरमाळा, उमरगा आणि तामलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
येरमाळा: तीन बंद घरे फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी तीन बंद घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २७ मे २०२५ रोजी रात्री ११ ते २८ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी परसराम वसंत बारकुल (वय २७ वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी परसराम बारकुल यांच्यासह अरुण श्रीहरी मोकाशे आणि प्रशांत भागवत बेंद्रे यांच्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख ४०,००० रुपये असा एकूण १,४५,००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. परसराम बारकुल यांनी २८ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
उमरगा: बसस्थानकावरून दोन मोटारसायकली चोरीला
उमरगा बसस्थानकाजवळील एका मेडिकल समोरून दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना २५ मे २०२५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी २८ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संदीप भानुदास ब्याळे (वय ३६ वर्षे, रा. चिंचोली(ज), ता. उमरगा, जि. धाराशिव) यांची एमएच २५ एएन २२८ क्रमांकाची, अंदाजे २०,००० रुपये किमतीची एचएफ डिलक्स मोटारसायकल (चेसी नं-MBLHAR23XJHC00448, इंजिन नंबर HA11ENJHC00983) आणि विनायक ग्यानबा नंदुर्ग (रा. होदलुर, ता. आळंद) यांची के.ए. ५३ यु ०१५२ क्रमांकाची स्पेंल्डर प्लस मोटारसायकल (चेसी नं-MBHHA10EYBHB21591, इंजिन नंबर HA10EFBHB26576) अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या. संदीप ब्याळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
तामलवाडी: सोलार पार्कमधून दीड लाखांच्या केबल चोरीला
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केमवाडी येथील नवलखा ट्रान्सलाईन्स प्रा. लि. सोलार पार्कमधून अज्ञात चोरट्याने डी.सी. केबल आणि कनेक्टर असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २६ मे २०२५ रोजी रात्री साडेअकरा ते २७ मे २०२५ रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत विश्वजीत भारत भोसले (वय ३५ वर्षे, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांनी २८ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सोलार पार्कच्या १२० सोलार टेबलचे ६ स्क्वेअर एम.एम. जाडीचे डी.सी. केबलचे १२ बंडल आणि ४ कनेक्टर असा एकूण १,५७,५०० रुपयांचा माल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.