मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत (३० मे रोजी सकाळपर्यंत) विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांतील वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात २४ मिमी, जालना जिल्ह्यात १३.९ मिमी, सोलापूर जिल्ह्यात १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले.
राज्यातील इतर जिल्ह्यांतील पावसाची आकडेवारी (मिमी मध्ये):
- कोकण विभाग: रायगड (०.३), रत्नागिरी (३.९), सिंधुदुर्ग (११.२), पालघर (०.१).
- उत्तर महाराष्ट्र: नाशिक (०.६), धुळे (०.४), जळगाव (०.१), अहिल्यानगर (०.५).
- पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर (१२.१), सातारा (१), सांगली (०.९), कोल्हापूर (०.८).
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर (०.६), जालना (१३.९), बीड (२४), लातूर (५.१), धाराशिव (४२.२), नांदेड (९.३), परभणी (३), हिंगोली (०.२).
- विदर्भ: बुलढाणा (२.२), अकोला (०.१), वाशिम (०.२), अमरावती (३.४), यवतमाळ (६.५), वर्धा (८.७), नागपूर (१.४), भंडारा (०.७), गोंदिया (३.९), चंद्रपूर (१.२), गडचिरोली (२.५).
धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस: पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचे मोठे नुकसान
धाराशिव: जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे आणि अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे, तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरुवारी रात्री झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील तब्बल २३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या एकाच रात्रीच्या पावसाने अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण केली. धाराशिव शहरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने दीड तास झोडपून काढले. यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक यांसारख्या प्रमुख चौकांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले होते, ज्यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.
ग्रामीण भागातही पावसाचा कहर पाहायला मिळाला. मोर्डा शिवारात २०१२ साली बांधलेला पाझर तलाव या मुसळधार पावसाने फुटला. यामुळे दोन शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली असून, त्यांच्या शेतातील ऊस आणि भुईमुगाचे पीकही उद्ध्वस्त झाले आहे. तामलवाडी आणि पिंपळा बुद्रुक परिसरातही शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
भूम तालुक्यातील सावरगाव (द.) येथून वाहणाऱ्या विश्वरूपा नदीला पूर आल्याने पुलावर झाड अडकून वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी थेट घरात घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात या पावसाने मे महिन्यातच पावसाळ्याच्या सरासरीची जवळपास निम्मी नोंद केली आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात २८८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरी ६०४ मिमी पाऊस पडतो. या आकडेवारीवरून पावसाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. या अभूतपूर्व पावसामुळे जिल्हा प्रशासन आणि नागरिक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत.