धाराशिव: जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत सुमारे २० लाख रुपयांच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये वाशी तालुक्यातील सोलर प्रकल्पाचे १६ लाखांचे साहित्य, धाराशिव ग्रामीण हद्दीतून ३ लाखांचे इंडस्ट्रियल साहित्य आणि एमआयडीसीतून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटनांचा समावेश आहे.
वाशी: सोलर प्रकल्पावर डल्ला, १६ लाख ८५ हजारांचे साहित्य चोरीला
वाशी शिवारात सुरू असलेल्या ‘जयसाई कन्स्ट्रक्शन’च्या साइटवरून चोरट्यांनी तब्बल १६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली.
चोरट्यांनी प्रकल्पावरून १९ हजार मीटर डीसी केबल, १८६ जंक्शन बॉक्स, ३०० वाय कनेक्टर, ४८० एमसी-फोर कनेक्टर आणि अर्थिंग केबल असा मोठा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर संतोष मेसाजी कारलेकर (रा. रामनगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी मच्छिंद्र राजेंद्र काळे, जालींदर प्रकाश शिंदे (दोघे रा. कन्हेरी) आणि बाबुषा रामा शिंदे (रा. दशमेगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धाराशिव ग्रामीण: सांजा बायपासवरून ३ लाखांचे साहित्य गायब
दुसऱ्या घटनेत, सांजा बायपास रोडवरील शिवाजी नगर येथून ३ लाख १९ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी पळवले. फिर्यादी सारिका भाऊसाहेब बेलुरे (वय ४०) यांच्या मालकीचे ऑक्सिजन वॉल (३५ नग), कॉपर झिंक फ्लेक्झीबल नोजल बोल्ट, इनरशेट (४० नग), अर्थिंग कॉपर पट्टी आणि १३ मीटर पाईप असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान घडली असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव आनंदनगर: एमआयडीसीतून युनिकॉर्न दुचाकी चोरीला
एमआयडीसी परिसरातील हॉटेल किंगच्या जिन्याजवळ लावलेली ३० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच २५ बीडी ०९३१) अज्ञात चोरट्याने पळवली. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी सज्जन श्रीराम मते (रा. दहिफळ, ता. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






