धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. अज्ञात चोरांनी चालत्या टेम्पोमधून मालाची पोती, घरासमोरून केबल, चौकातून मोटारसायकल आणि शेतातून पेरणी यंत्र लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चालत्या टेम्पोमधून माल लंपास
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला. फिर्यादी चाँद इकबाल अत्तार (वय ३५) हे २ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच २५ ए.जे. ८६००) घेऊन सोलापूरकडे जात होते. पवारवाडी ते वरुडा मार्गावर असताना, अज्ञात चोरांनी चालत्या टेम्पोमधून अंदाजे १९,००० रुपये किमतीची १० पेंडींची पोती चोरून नेली. याप्रकरणी ५ सप्टेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घरासमोरून केबल आणि पेंडीची चोरी
आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, शाजीमार कॉलनी येथील रहिवासी फहिमोद्दीन नईमोद्दीन काझी (वय ५४) यांच्या घरासमोरून चोरी झाली. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्यांच्या अंगणात ठेवलेले खापरी पेंडीचे ६ पोते आणि २५० फूट केबल असा एकूण १७,८०० रुपयांचा माल अज्ञात चोराने चोरून नेला. याप्रकरणी ५ सप्टेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापुरातून मोटारसायकलची चोरी
तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. सलगरा येथील प्रभाकर रमेश कोळी (वय ३४) यांनी आपली २५,००० रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.ए. ५२६२) ३ सप्टेंबर रोजी रात्री पार्क केली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शेतातून पेरणी यंत्राची चोरी
भूम तालुक्यातील पाथरुड येथील शेतकरी उमेश श्रीराम कराळे (वय २३) यांचे शेतीचे अवजार चोरीला गेले आहे. २१ जुलै ते २४ जुलै २०२५ दरम्यान, बेदरवाडी येथील त्यांच्या शेतात ठेवलेले अंदाजे २५,००० रुपये किमतीचे जुने पेरणी यंत्र अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. याप्रकरणी ५ सप्टेंबर रोजी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे नोंदवले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.