स्थळ: जिल्हा नियोजन समिती (DPC) सभागृह, धाराशिव (जिथे आजकाल बातम्यांपेक्षा परवानग्यांचेच जास्त नाट्य घडते!)
धाराशिव, १ मे: आज महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब धाराशिव दौऱ्यावर आले होते. निमित्त होते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे. आता DPC बैठक म्हणजे धाराशिवमध्ये नुसता धुरळा! आरोप-प्रत्यारोपांच्या फटाक्यांची आतषबाजी आणि पत्रकारांसाठी गरमागरम ‘मसाल्याची’ नुसती रेलचेल! पण गंमत म्हणजे, या मसालेदार बैठकीत पत्रकारांना आजवर ‘नो एन्ट्री’चा बोर्ड होता.
मागच्या बैठकीत पत्रकारांनी पालकमंत्र्यांकडे ‘आम्हाला पण येऊ द्या की राव!’ अशी गळ घातली होती. मोठ्या मनाने साहेबांनी पण ‘या रे पुढच्या बैठकीला!’ म्हणत परवानगी दिली होती. त्यामुळे आज सगळे पत्रकार मंडळी कॅमेरे वगैरे चार्ज करून तयार होते.
पण सकाळी सकाळी, साधारण ७:३७ च्या ठोक्याला, जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘इन्फो धाराशिव’मध्ये, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे साहेबांचा एक मेसेज अवतरला: “लक्षवेध: आजच्या DPC बैठकीत माध्यमांना प्रवेश नाहीये, कळतंय का?” (शब्दशः नाही, पण भावार्थ हाच!). झालं! पत्रकार चक्रावले! काल दिलेला शब्द आज सकाळी हवेत विरला?
मग काय, झेंडावंदन झाल्यावर काही धाडसी पत्रकारांनी थेट पालकमंत्र्यांनाच गाठलं आणि तो व्हॉट्सॲप मेसेज दाखवला. मंत्रीमहोदयांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि नवीन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार साहेबांना सांगितले, “अहो, त्यांना येऊ द्या की!”
आणि… जादू! सकाळी ८:४६ वाजता, त्याच ग्रुपवर, त्याच खडसे साहेबांचा दुसरा मेसेज आला: “लक्षवेध: आजच्या DPC बैठकीत मा. पालकमंत्र्यांच्या परवानगीने माध्यमांना प्रवेश आहे हं!” अवघ्या एका तासात ‘नो एन्ट्री’चा ‘वेलकम’ झाला! आता हा पहिला मेसेज कुणाच्या सांगण्यावरून टाकला होता, हे एकतर खडसे साहेबांना माहिती किंवा त्या अदृश्य शक्तीला! जिल्हाधिकारी तर नवीन आहेत, बिचारे !
अखेरीस, पत्रकारांनी सभागृहात प्रवेश मिळवला आणि अपेक्षेप्रमाणे खा. ओमराजे निंबाळकर विरुद्ध आ. राणा पाटील यांच्यातील ‘तू तू-मैं मैं’ चा ताजा मसाला मिळवलाच!
बैठक संपल्यावर काही पत्रकार मंडळी पुन्हा जिल्हाधिकारी पूजार साहेबांना भेटली. “अहो साहेब, जाऊ द्या, माफ करा खडसेंना,” अशी विनंती केली. सोबतच, “मावळते जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे साहेब लय भारी होते, नेहमी भेटायचे, बाईट द्यायचे,” अशी लाडीगोडी लावायचा प्रयत्नही केला.
(टीप: आता डॉ. ओम्बासे साहेब काही पत्रकारांची ‘वेगळी काळजी’ घ्यायचे, त्यांना ‘पाकिटे’ आणि ‘कामे’ द्यायचे, हा संशोधनाचा आणि अर्थातच, बातमीचा भाग नाही!)
थोडक्यात काय, तर धाराशिवच्या DPC बैठकीच्या आधीच परवानगीचा एक छोटा ‘मिनी ड्रामा’ रंगला आणि पत्रकारांना बातमीआधीच बातमी मिळाली!