धाराशिव – ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या नमाजासाठी जमलेले लोक आकाशात सौंदर्य पाहत होते… पण ते सौंदर्य नव्हे तर ड्रोनगिरी होती! आणि आता या ड्रोनवरून दोन आमदारांचे मुस्लिम कार्यकर्ते अक्षरशः भिडले – एकमेकांवर आरोपांच्या रील्सचा पाऊसच पडला!
काल भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका करत, “हे आमदार आम्हाला त्रास देत आहेत!” अशी भुमिका घेतली. तर आज रिव्हर्स गियर टाकत कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, “हे ड्रोन उडणं म्हणजे नमाजात अडथळा आणि सुरक्षेचा धोका!” असं ठणकावून सांगितलं.
ड्रोन उडाले… आणि नमाजात ‘ब्रेक’ लागले!
शहरातील मुस्लिम बांधवांनी यावर तक्रार दाखल करत स्पष्ट केलं – “पोलीसांचा एक अधिकृत ड्रोन असतानाही दोन खासगी ड्रोन अगदी खालच्या पातळीवरून फिरत होते. त्यामुळे नमाजात एकाग्रता राहिली नाही, आणि धार्मिकतेवर रील इफेक्ट पडला.”
कोणाचा ड्रोन? काय हेतू?
सगळा मुद्दा इथेच तापला – हे खासगी ड्रोन कोणाचे? कोणी सांगितलं लावायला? आणि मुख्य म्हणजे, याचा फुटेज कोणा आमदाराच्या सोशल मीडिया टीमकडे गेलं?
एका कार्यकर्त्याने तर बोलून टाकलं – “हा प्रकार प्रसिद्धीच्या हव्यासातूनच झाला… किंवा कायदा-सुव्यवस्थेला डिस्टर्ब करायचाच डाव असावा!”
‘ड्रोन कोसळला असता तर…’
निवेदनात बीडमधील अलीकडील घटनेचा संदर्भ देत, ड्रोन कोसळल्यास चेंगराचेंगरी होण्याची, लहान मुलांना इजा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे याची फुल सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
सध्या हे सगळं “रील वि. रिअॅलिटी”चं युद्ध झालं आहे. एकीकडे ड्रोनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चढवण्यासाठी धडपड, तर दुसरीकडे धार्मिक वातावरण बिघडल्याचा आरोप. प्रशासन काय करणार, कोणावर कारवाई होणार – याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पण धाराशिवकर म्हणतायत – “ईद आली, नमाज झाली, आणि आता ड्रोनची राजकीय उडाणही सुरू झाली… बस, आता रील नको, थोडी शांती द्या हो भावा!”