धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील कथित सूत्रधार, विनोद उर्फ पिटू गंगणे, याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (९ जून) संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. मात्र, आजच्या सुनावणीचे वैशिष्ट्य ठरले ते तपास अधिकाऱ्यांचे अज्ञान आणि त्यामुळे न्यायधीशांनी व्यक्त केलेली तीव्र नाराजी. अखेरीस, न्यायालयाने गंगणेच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे.
न्यायालयात आज काय घडले?
पिटू गंगणेला आज धाराशिव जिल्हा न्यायालयात न्यायाधीश मिटकरी मॅडम यांच्यासमोर हजर करण्यात आले. मात्र, या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी, गोकुळ ठाकूर, आज सुनावणीसाठी अनुपस्थित होते. त्यांच्या जागी हजर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाडे या बदली अधिकाऱ्याला प्रकरणाविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून आले.
न्यायाधीशांनी जेव्हा गुन्ह्याचा तपशील, गंगणेचा मोबाईल जप्त का केला नाही, आणि मुख्य तपास अधिकारी साक्षीसाठी नेमके कुठे गेले आहेत, असे प्रश्न विचारले, तेव्हा बदली अधिकाऱ्याने “माहित नाही” अशी उत्तरे दिली. या प्रकारामुळे न्यायाधीश चांगल्याच संतापल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला “आधी रिमांडची यादी वाचून या!” अशा शब्दांत सुनावले. त्यानंतर तो अधिकारी न्यायालयाबाहेर जाऊन कागदपत्रे वाचून परत आला.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि कोठडीत वाढ
तपास अधिकाऱ्यांच्या या गोंधळानंतरही, सरकारी पक्षाने गंगणेच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, गंगणेचा गायब असलेला मोबाईल हस्तगत करणे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा मोबाईल या प्रकरणातील अनेक मोठ्या नावांचा खुलासा करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
बचाव पक्षाने पोलीस कोठडीला विरोध केला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने पिटू गंगणेला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच न्यायालयालायीन कोठडी होण्याअगोदरच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला, तो न्यायालयाने नामंजूर केला.
पुढील तपास आव्हानात्मक
गंगणेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली असली तरी, आज न्यायालयात घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांच्या तपासातील त्रुटी उघड झाल्या आहेत. या प्रकरणात कलम २९ (कट रचणे) लावल्यामुळे पोलिसांना गंगणेकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी अधिक सक्षम आणि नियोजनबद्ध तपासाची गरज असल्याचे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. आता या वाढीव कोठडीत पोलीस काय नवीन माहिती समोर आणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.