धाराशिव : शहरातील बँक कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून गोंधळ घालणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीविरोधात आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २८) रात्री करण्यात आली.
श्रीकांत विठ्ठल जगदाळे (वय ४० वर्षे, रा. बँक कॉलनी, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आनंदनगर पोलीस ठाण्याचे पथक बँक कॉलनी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी बाल गणेश मंडळाजवळ श्रीकांत जगदाळे हा मद्यपान केलेल्या अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करून सार्वजनिक शांततेत अडथळा निर्माण करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या वर्तनाची नोंद घेतली. याप्रकरणी, पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन श्रीकांत जगदाळे याच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.