धाराशिव: रास्त भाव दुकानदारांकडून नूतनीकरणासाठी आवश्यक शुल्क भरले न गेल्याने तहसीलदारांनी कथितरीत्या थांबवलेली परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, श्रीमती स्वाती शेंडे यांनी या संदर्भात एक पत्रक जारी केले असून, थकीत नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दिनांक १९ मे २०२५ रोजी धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, परंडा, वाशी व भूम येथील तहसीलदारांना हे पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार, शासन निर्णय दिनांक २ फेब्रुवारी २००२ अन्वये रास्त भाव दुकानांचे प्राधिकारपत्र दर तीन वर्षांनी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. तथापि, अनेक दुकानदारांनी अद्यापही आपल्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. ही बाब अत्यंत खेदजनक व गंभीर स्वरूपाची असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्या रास्त भाव दुकानदारांच्या प्राधिकारपत्रांचे नूतनीकरण प्रलंबित आहे, त्यांच्याकडून अनामत रक्कम जप्त करून, नूतनीकरणाच्या दिवसापर्यंत प्रतिदिन १ रुपयांप्रमाणे दंडाची रक्कम चलनाद्वारे भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नूतनीकरण केलेले प्राधिकारपत्र व चलनाची प्रत तीन दिवसांच्या आत जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणात, प्राधिकारपत्रांचे नूतनीकरण न करता रास्त भाव दुकानदारांना धान्य वितरित केल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर राहील, असा इशाराही श्रीमती शेंडे यांनी दिला आहे. या आदेशाची एक प्रत उपविभागीय अधिकारी धाराशिव, भूम, कळंब व उमरगा यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
रास्त भाव दुकानदारांनी पैसे न दिल्याने त्यांच्या दुकानाचे नूतनीकरण तहसीलदारांनी अडवले होते. होते. आता जिल्हा पुरवठा अधिकारी, श्रीमती स्वाती शेंडे यांच्या या आदेशानंतर तरी नूतनीकरण होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.