धाराशिव: ज्याच्यावर तब्बल २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा तुळजापूरच्या एका कुख्यात मटका किंगच्या तक्रारीवरून थेट एका पत्रकारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची धक्कादायक तयारी तुळजापूर पोलिसांनी सुरू केली आहे. बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून ‘धाराशिव लाइव्ह’ या वेब पोर्टलच्या संपादकांना पोलिसांनी समन्स बजावले असून, येत्या २८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. या संपूर्ण प्रकारामागे स्थानिक आमदार राणा पाटील यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप होत असून, या घटनेमुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणीराजाभाऊ माने यांनी तामलवाडी पोलिसांना जबाब दिला होता. या जबाब प्रकरणी आपली बदनामी केल्याची तक्रार या मटका किंगने तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. ज्याची बातमी ‘धाराशिव लाइव्ह’ने प्रसिद्ध केली. मात्र, तुळजापूर पोलिसांनी माने यांचा जबाब नोंदवून घेण्याऐवजी, त्यांनाच आरोपी बनवल्याचा अजब प्रकार घडला. ‘धाराशिव लाइव्ह’ने पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेवर प्रकाश टाकत, सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली.
बातमी लावताच पोलिसांचा सूड?
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बातमी प्रसिद्ध होताच, पोलीस यंत्रणा हादरली. सुरुवातीला ‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकांना या प्रकरणात ‘साक्षीदार’ म्हणून समन्स पाठवण्यात आले. मात्र, आता अचानक त्यांची भूमिका बदलून, “तुम्हाला देखील आरोपी करायचे आहे,” असे सांगत थेट आरोपी म्हणूनच हजर राहण्यासाठी नवीन समन्स बजावण्यात आले आहे. एखाद्या प्रकरणाची बातमी छापणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? हा साधा प्रश्न विचारला जात असताना, तुळजापूर पोलीस मात्र आमदार राणा पाटील यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे.
सत्तेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न?
‘धाराशिव लाइव्ह’चा आवाज दाबण्यासाठी केवळ पोलीसच नव्हे, तर आमदार राणा पाटील यांच्या समर्थकांनी देखील कंबर कसली आहे. आमदार समर्थकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना खोटे निवेदन देऊन, या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा आणि पोर्टलची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीला पोलीस इतके महत्त्व देतात, तर दुसरीकडे सत्य मांडणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी थेट त्यालाच आरोपी बनवतात. हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला थेट हल्ला असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आता येत्या २८ ऑगस्ट रोजी पोलीस काय भूमिका घेणार आणि पत्रकारिता स्वातंत्र्य अबाधित राहणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘चमच्यां’च्या निवेदनानंतर संपादक सुनील ढेपेंचा राणा पाटलांना थेट इशारा: “हिंमत असेल तर संपत्तीची अदलाबदल करा, मी गोरगरिबांना वाटून टाकेन!”
धाराशिव: आमदार राणा पाटील यांच्या समर्थकांनी ‘धाराशिव लाइव्ह’ न्यूज पोर्टल आणि त्याचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देताच, संपादक ढेपे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्यावर आरोप करण्याऐवजी हिंमत असेल तर आमदार राणा पाटलांनी माझ्याशी संपत्तीची अदलाबदल करावी, त्यांची सर्व संपत्ती मी गोरगरिबांना वाटून टाकेन,” असे थेट आव्हानच ढेपे यांनी दिले आहे.
आमदार पाटील यांच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनात ‘धाराशिव लाइव्ह’ला शासनाची परवानगी नसल्याचा दावा केला आहे. यावर ढेपे यांनी “हा घ्या पुरावा” म्हणत आपला दावा खोडून काढला.
या निवेदनातील दुसरी मागणी संपादक सुनील ढेपे यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासण्याची होती. या मागणीला केवळ सहमती न दर्शवता, ढेपे यांनी एक पाऊल पुढे टाकत, “माझे CDR जरूर तपासा, पण सोबत आमदार राणा पाटील आणि मल्हार पाटील यांचेही CDR तपासले पाहिजेत,” अशी प्रतिमागणी केली आहे.
तिसरा आणि सर्वात गंभीर आरोप ढेपे यांच्या पुण्यातील संपत्तीच्या चौकशीची मागणी हा होता. यावर सुनील ढेपे यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “माझ्या संपत्तीची जरूर चौकशी करा, पण त्याचवेळी राणा पाटील आणि त्यांच्या चमच्यांच्या संपत्तीचीही निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.”
आपल्या भूमिकेला अधिक धार देत ढेपे यांनी एक अभूतपूर्व आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “माझी सगळी संपत्ती आमदार राणा पाटलांच्या नावावर करा आणि त्यांची माझ्या नावावर करा. मी ती सर्व संपत्ती इथल्या गोरगरिबांना वाटून टाकीन.”
शेवटी, पोलिसांमार्फत दबाव टाकण्याच्या या प्रकारावर बोट ठेवत ढेपे यांनी सुनावले, “चमच्यांनो, जर तुमची खरंच बदनामी झाली असेल, तर कायदेशीर मार्ग वापरा आणि कोर्टात दावा दाखल करा. प्रत्येक वेळी पोलिसांचा आधार का घेता?”
या थेट आणि आक्रमक उत्तरानंतर धाराशिवच्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.