अहो, सासरवाडीला आलेला जावई काही दिवस राहतो, मानपान घेतो आणि परत जातो. पण आमच्या धाराशिव जिल्ह्याला असा एक जावई लाभलाय, जो गेल्या आठ महिन्यांपासून मुक्कामाला आहे आणि परत जायचं नावच घेत नाहीये! हे जावईबापू म्हणजे विदर्भाच्या टिपेश्वर जंगलातून आलेला एक उमदा आणि रुबाबदार वाघ!
सुरुवातीला वाटलं, पाहुणे आलेत, जरा फिरतील आणि जातील. त्यानुसार, जावईबापूंनी येडशीच्या अभयारण्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर भूम, वाशी, कधी बार्शी, असा सगळा जिल्हा त्यांनी जणू पायाखाली घातला. जणू काही सासरवाडीची मालमत्ताच मोजत आहेत! त्यांच्या या ‘मॉर्निंग वॉक’ने मात्र सगळ्यांची झोप उडवली आहे.
या हाय-प्रोफाईल जावयाला सन्मानाने त्यांच्या घरी, म्हणजे जंगलात, परत पाठवण्यासाठी थेट ताडोबा आणि पुण्याहून ‘स्पेशल पथकं’ आली. पण आपले जावईबापू भारीच हुशार! त्यांनी असा काही चकवा दिला की आलेली पथकं नुसते हात हलवत, “जावई काही सापडेना,” असं म्हणत परत गेली.
आता नवीन बातमी अशी आहे की, हे महाशय तुळजापूरच्या सिंदफळ परिसरात दर्शन देत आहेत. इथल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जावईबापूंनी पाहुणचार म्हणून एक गाय आणि दोन वासरांवर आडवा हात मारला आहे. बिचाऱ्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केली, तर तिथून अजबच उत्तर आलं!
वन विभाग म्हणतो, “अहो, तो वाघ नाहीच! तो तर बिबट्या आहे. आमचे जावई असे नाहीत. ते एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाहीत आणि परत तर अजिबात येत नाहीत.” म्हणजे, एकीकडे शेतकरी जीव मुठीत धरून बसलाय आणि दुसरीकडे वन विभाग आपल्या ‘जावया’ला ‘क्लीन चिट’ देण्यात व्यस्त आहे.
या सगळ्या खेळात ‘जावईबापूंना’ पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत आणि ऐकीव माहितीनुसार, बोगस बिलांचा रतीबही सुरू आहे. म्हणजे जावयाचा पाहुणचार चांगलाच महागात पडतोय!
थोडक्यात काय, तर धाराशिव जिल्ह्यात सध्या एक वाघ आणि १४ बिबटे मिळून ‘हम साथ साथ हैं’चा खेळ खेळत आहेत. शेतकरी त्रस्त आहे, वन विभाग सुस्त आहे आणि आमचे ‘टिपेश्वरवाले जावई’ मात्र संपूर्ण जिल्ह्यात मस्त फिरत आहेत. आता हे जावई सासरवाडीतच कायमचा मुक्काम ठोकणार की परत आपल्या घरी जाणार, हे येणारा काळच ठरवेल!
– बोरूबहाद्दर