धाराशिव: धाराशिव शहरातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममधून अचानक मशीनचा संशयास्पद आवाज आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ईव्हीएम पडताळणी सुरू केल्याचे समोर आल्यानंतर, ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्ट्रॉंग रूमबाहेर जोरदार गोंधळ घातला आणि प्रशासनाला जाब विचारला.
नेमका प्रकार काय?
न्यायालयाच्या आदेशाने शहरातील तीन प्रभागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सध्या ईव्हीएम मशीनची पडताळणी प्रक्रिया (First Level Checking) सुरू करण्यात आली होती. मात्र, पहिल्या टप्प्याची ही पडताळणी सुरू करताना प्रशासनाने संबंधित उमेदवार किंवा राजकीय पक्षांना कोणतीही अधिकृत सूचना दिली नव्हती. अचानक स्ट्रॉंग रूममधून मशीनचा बीप किंवा अन्य आवाज येऊ लागल्याने परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
दोन्ही सेना आल्या एकत्र
ईव्हीएम मशीनचा आवाज आल्यानंतर आणि प्रशासनाचा हा प्रकार लक्षात आल्यावर राजकीय मतभेद बाजूला सारत ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते तातडीने स्ट्रॉंग रूमवर दाखल झाले. दोन्ही गटांनी एकत्र येत प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा निषेध केला. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) फोन लावून, “उमेदवारांना न कळवता पडताळणी का सुरू केली?” असा जाब विचारला.
प्रशासनाकडून चूक मान्य
कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली. उमेदवार व राजकीय पक्षांना न कळवताच मशीन पडताळणी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, यामुळे कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही.
सीसीटीव्ही फुटेज आणि खडा पहारा
प्रशासनाच्या या संदिग्ध भूमिकेमुळे कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. स्ट्रॉंग रूममध्ये मशीन ठेवल्यापासून ते आतापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दोन्ही गटांनी केली आहे. तसेच, जोपर्यंत शंका दूर होत नाही, तोपर्यंत स्ट्रॉंग रूमबाहेर ‘खडा पहारा’ देण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. सध्या स्ट्रॉंग रूमबाहेर तणावाचे वातावरण असून दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झाली आहे.






