धाराशिव – हनुमान जयंतीसाठी वर्गणी दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला रस्त्यात अडवून चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना धाराशिव शहरातील पाथ्रुड चौक परिसरात घडली. ही घटना काल, दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींनी फिर्यादीच्या पत्नी आणि आईला देखील शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ हनुमंत चव्हाण (वय ४० वर्षे, रा. पाथ्रुड चौक, धाराशिव) हे दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी पाथ्रुड चौकातून जात असताना, आरोपी फुलचंद देवकर, लहु कुऱ्हाडे, नितीन देवकर आणि प्रविण पवार (सर्व रा. वडर गल्ली, शिवाजी चौक, धाराशिव) यांनी त्यांना अडवले. ‘हनुमान जयंतीसाठी वर्गणी का दिली नाही?’ असा जाब विचारत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून नवनाथ चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने आणि बेल्टने मारहाण करून त्यांना जखमी केले.
यावेळी फिर्यादीची पत्नी आणि आई भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली, ज्यात त्यादेखील जखमी झाल्या. आरोपींनी नवनाथ चव्हाण यांचा मोबाईल फोन फोडून त्यांचे नुकसान केले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर नवनाथ चव्हाण यांनी तात्काळ धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी फुलचंद देवकर, लहु कुऱ्हाडे, नितीन देवकर आणि प्रविण पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३५१(२), ३५२, ११५(२), ३२४(४), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.