धाराशिव: शहरालगत असलेल्या कौडगाव तांडा येथे घरासमोर गोंधळ घालण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या पती व सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मंगळवार, दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सुहानी नितीन चव्हाण (वय २०, रा. कौडगाव तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहानी चव्हाण यांच्या घरासमोर विनोद शिवलाल शिंदे, बालाजी गणपत भोसले, रवी विकास भोसले, नितीन किरण शिंदे, उमेश शिवाजी शिंदे, लहू कपा शिंदे, अभिषेक बालाजी भोसले, प्रशांत विनोद शिंदे, समाधान मिटाराम शिंदे, अजय मिटाराम शिंदे, सोमेश्वर विलास भोसले, विकास गणपत भोसले, अविनाश कपा शिंदे, श्रीकांत किरण शिंदे, कपा पवना शिंदे, शिवलाल पवना शिंदे आणि कुंदन बालाजी भोसले (सर्व रा. कौडगाव तांडा) हे बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालत होते.
यावेळी फिर्यादीचे पती नितीन चव्हाण यांनी त्यांना शिवीगाळ करून गोंधळ घालू नका, असे समजावून सांगितले. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी सुहानी चव्हाण, त्यांचे पती नितीन, तसेच सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर सुहानी चव्हाण यांनी शुक्रवारी, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), (३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.