धाराशिव – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ चा उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ चार कोटी रुपये वाटप केले आहेत. विमा देण्यास कंपनी उशीर करत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
ख्ररीप २०२२ हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले होते, काही ठिकाणी अनेक दिवस पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांना पीक विमा देणे बंधनकारक असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने निम्मीच रक्कम वाटप करून शेतकऱ्यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या होत्या. याप्रकरणी अनिल जगताप यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ चार कोटी रुपये वाटप केले आहेत. आठवड्याला केवळ ५० कोटी रुपये देण्याचे कंपनीने कबूल केले असून, त्यामुळे सर्व पात्रधारक शेतकऱ्यांना विमा मिळण्यास किमान दीड महिना लागणार आहे.
कंपनीने तातडीने सर्व पीक विमा वाटप करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी दिला आहे.