भूम – आजकाल अनेकजण अगदी साधेपणाने लग्न करण्याला पसंती देत असताना, धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मात्र आपल्या मुलाच्या लग्नात आणि विशेषतः सुनेसाठी असा काही शाही थाट केला आहे, ज्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या आपल्या सुनेला लग्नात कोणताही कमीपणा भासू नये म्हणून, सासऱ्याने चक्क तिच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून तिला सासरी आणलं आणि त्याच हेलिकॉप्टरमधून वधू-वरांची गावात मिरवणूक काढली.
भूम तालुक्यातील अंतरवली गावात ही आनंददायी आणि तितकीच चर्चेची घटना घडली आहे. येथील रहिवासी शेतकरी भास्कर शिकेतोड यांच्या लहान मुलाचं, आकाशचं, लग्न सावरगाव येथील अस्मितासोबत ठरलं होतं. अस्मिताने लहानपणीच आई-वडिलांना गमावलं असून तिचा सांभाळ तिच्या मामाने केला होता. लग्नासाठी अस्मिताला तिच्या माहेरहून, म्हणजे सावरगावहून (जे अंतरवली गावापासून अवघे दोन किलोमीटर अंतरावर आहे), सासरी आणायचं होतं.
सासऱ्याने सुनेसाठी पुरवला ‘शाही थाट’
मुलीला माहेरहून आणण्यासाठी आणि तिला लग्नात कोणताही कमीपणा भासू नये, तिला मोठा ‘थाट’ मिळावा या एकमेव इच्छेने भास्कर शिकेतोड यांनी थेट हेलिकॉप्टरच बुक केलं. ठरल्याप्रमाणे, अस्मिताला आणण्यासाठी हेलिकॉप्टर सावरगाव येथे पोहोचले. अस्मिताला हेलिकॉप्टरमधून अंतरवली येथे आणण्यात आले. यानंतर केवळ मुलीला आणण्यासाठीच नाही, तर त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसवून नववधू अस्मिता आणि वर आकाश यांची गावामध्ये शाही मिरवणूक काढण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आई-वडिलांच्या आठवणीने कदाचित हळवी होणाऱ्या सुनेच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सासऱ्याने उचललेलं हे पाऊल होतं, असं बोललं जात आहे.
शेतकऱ्याची हेलिकॉप्टरची हौस जुनी
शेतकरी भास्कर शिकेतोड यांची ही हेलिकॉप्टरची हौस तशी जुनीच आहे. त्यांनी यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नातही हेलिकॉप्टरमधून मिरवणूक काढली होती. विशेष म्हणजे, भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नाची मिरवणूक साध्या मोटरसायकलवरून झाली होती. त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्नात तरी हेलिकॉप्टरचा थाट करायचा, असा निर्धार त्यांनी केला होता, असं ते सांगतात.
आकाश आणि अस्मिता यांचा विवाह आज मोठ्या आनंदात पार पडला असला तरी, या लग्नापेक्षा सध्या सासऱ्याने आपल्या सुनेसाठी, विशेषतः आई-वडील नसलेल्या मुलीसाठी केलेल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टीची आणि मायेच्या ‘थाटा’ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. या अनोख्या विवाहसोहळ्याबद्दल बोलताना वरबाप भास्कर शिकेतोड आणि नववधू अस्मिता शिकेतोड यांनी आपला आनंद व्यक्त केला.
Video