तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नळदुर्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मुला-बाळांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाचा बळी
तुळजापूर: “दोन वर्षांपूर्वी विहीर आणि पाईपलाईनसाठी खासगी कर्ज काढले, पण अतिवृष्टीने ऊस आणि सोयाबीनचे पूर्ण नुकसान झाले. आता हे कर्ज कसे फेडायचे?” ही व्यथा आपल्या चुलत भावाकडे मांडणाऱ्या अणदूर येथील तरुण शेतकऱ्याने अखेर आपले जीवन संपवले. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४४) असे या शेतकऱ्याचे नाव असून, मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत उमेश यांचे चुलत भाऊ चंद्रकांत अनिल ढेपे (वय ३९) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. 2आपल्या जबाबात चंद्रकांत यांनी म्हटले आहे की, मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांना उमेश यांनी घरातील पत्र्याखालील लोखंडी पाईपला उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समजले.
उमेश हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यासाठी आणि पाईपलाईन करण्यासाठी खासगी व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेत सर्व्हे क्रमांक २४९ आणि २८५/४ मधील ऊस आडवा पडला होता, तर सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले होते. यामुळे झालेल्या नुकसानीमुळे आणि डोक्यावरील कर्जामुळे ते हताश झाले होते आणि याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चंद्रकांत ढेपे यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे.
नळदुर्ग पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.