धाराशिव: तालुक्यातील आळणी येथील शेतकरी तानाजी नानासाहेब भराडे यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी अनुराधा भराडे आणि तिचा प्रियकर बालाजी घाडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटकेनंतर प्रकरणाला एक नवी दिशा मिळाली असली तरी, भराडे यांच्या दोन मुलांच्या भविष्यावर टांगती तलवार कायम आहे.
काय आहे प्रकरण?
आळणी येथील शेतकरी तानाजी नानासाहेब भराडे यांनी काल आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली पत्नी अनुराधा हिचे धाराशिव शहरातील दुकानदार बालाजी घाडगे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा आणि या दोघांकडून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. याच त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते.
या व्हिडिओमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. तानाजी भराडे यांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
पोलिसांची कारवाई
घटनेचे गांभीर्य आणि व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारे धाराशिव ग्रामीण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी तानाजी यांची पत्नी अनुराधा भराडे आणि तिचा प्रियकर बालाजी घाडगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. बालाजी घाडगे हा देखील विवाहित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, या अटकेमुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
मुलांचे भविष्य अंधारात
या दुर्दैवी घटनेत सर्वात मोठी परवड तानाजी भराडे यांच्या मुलांची झाली आहे. त्यांचा मोठा मुलगा इयत्ता अकरावीत तर लहान मुलगा आठवीत शिकत आहे. वडिलांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे, तर आईला पोलिसांनी अटक केली आहे. या परिस्थितीमुळे दोन्ही मुले पोरकी झाली असून, त्यांच्या पालनपोषणाचा आणि शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या भविष्याकडे पाहणारा सध्या कोणीही वाली उरलेला नाही, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.