धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेगवेगळ्या शासन निर्णयांमधून (GR) जिल्ह्यासाठी एकूण ५२२ कोटी ५८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत जाहीर होऊनही प्रत्यक्ष अनुदान वितरणाची गती अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना, विशेषतः दिवाळीच्या तोंडावर, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने ज्या गतीने निर्णय जाहीर केले, त्याच गतीने मदत वितरण करावे, अशी मागणी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जमिनी खरवडून गेल्या आहेत, घरांची पडझड झाली आहे, आणि अनेक पशुधन वाहून गेले आहे. रस्ते, पूल आणि महावितरणच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीच्या आधारे शासनाने तीन टप्प्यात मदत जाहीर केली. श्री. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार:
- २३ सप्टेंबर जीआर: ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीपोटी २ लाख ३४ हजार ९५५ शेतकऱ्यांना १८९ कोटी ६० लाख ६७ हजार रुपये.
- १६ ऑक्टोबर जीआर: ४ लाख ४ हजार ६५६ शेतकऱ्यांना २९२ कोटी ४९ लाख रुपये.
- १७ ऑक्टोबर जीआर: जमिनी खरवडून गेलेल्या ३३,२६३ शेतकऱ्यांना ४० कोटी ४८ लाख रुपये.
अशाप्रकारे, एकूण ६ लाख ३९ हजार ६११ शेतकऱ्यांसाठी ५२२ कोटी ५८ लाखांची मदत मंजूर झाली आहे.
वितरणातील अडथळे आणि जगताप यांची मागणी
अनिल जगताप यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राज्य शासनाने मदत जाहीर केली हे स्वागतार्ह आहे, पण ती शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर कशी वर्ग होईल, हे पाहणे जिल्हा प्रशासनाचे काम आहे. जरी ‘ॲग्री स्टिक’द्वारे मदत दिली जात असली, तरी सुमारे २०% शेतकरी या प्रणालीवर नाहीत. त्यांना केवायसीद्वारेच (KYC) मदत मिळणार आहे. मात्र, १ ऑक्टोबरपासून केवायसी पोर्टल बंद असल्याने या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शासनाने हे पोर्टल तातडीने सुरू करण्याची गरज आहे.”
१६ ऑक्टोबरच्या जीआरमधील तालुकानिहाय मदत (२९२.४९ कोटी)
- धाराशिव: ४१,५७४ शेतकरी (४० कोटी ५१ लाख रु.)
- तुळजापूर: ७३,३११ शेतकरी (६७ कोटी ६० लाख रु.)
- उमरगा: ६८,३३१ शेतकरी (६१ कोटी ४५ लाख रु.)
- लोहारा: १०,३५० शेतकरी (१० कोटी ६० लाख रु.)
- भूम: ४९,२५० शेतकरी (२३ कोटी ११ लाख रु.)
- परंडा: ७३,११७ शेतकरी (७० कोटी ५७ लाख रु.)
- कळंब : ५५,२८७ शेतकरी (११ कोटी ८९ हजार रु.)
- वाशी: ३३,४३६ शेतकरी (८ कोटी १२ लाख रु.)
सध्या जाहीर झालेली ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत आहे. याव्यतिरिक्त, आणखी एक हेक्टरचे ८,५०० रुपये तसेच रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले प्रती हेक्टर १० हजार रुपये, या मदतीचा प्रस्तावही लवकरच शासनाकडे जाणार असून, ती मदतही शासन निर्णयानंतर वितरित केली जाईल, असेही सांगण्यात आले.






