धाराशिव – “सवंग लोकप्रियता आणि फोटोसेशन करण्यापेक्षा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देण्यावर भर द्यावा, केवळ चमकोगिरी नसावी,” असे परखड मत अनिल जगताप यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहे. धाराशिव जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांतील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीसंदर्भात धक्कादायक वास्तव त्यांनी आकडेवारीनिशी समोर आणले आहे.
कोट्यवधींचे नुकसान, मदतीची प्रतीक्षा
मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत, जनावरे वाहून गेली आहेत आणि काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्याला केवळ शासकीय मदतीचाच आधार असतो. मात्र, दौरे, आश्वासने आणि सोशल मीडियावरील घोषणांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष काय पडते, हा संशोधनाचा विषय बनला असल्याचे जगताप यांनी म्हटले.
आकडेवारीतील विषमता
गेल्या तीन वर्षांतील शासकीय मदतीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास त्यात मोठी तफावत दिसून येत आहे.
- सर्वाधिक मदत: क्षेत्रफळ आणि शेतकरी संख्या पाहता लोहारा तालुक्याला सर्वाधिक मदत मिळाली आहे. २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली असून, तिचे वितरण आठवडाभरात पूर्ण होईल.
- मदतीपासून वंचित: धक्कादायक बाब म्हणजे, तुळजापूर आणि भूम तालुक्यांना गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी व सततच्या पावसाचे अनुदान मिळालेले नाही. तसेच, कळंब तालुक्यालाही २०२३ मध्ये कोणतेही अनुदान प्राप्त झालेले नाही. ही आकडेवारी शेतकऱ्यांच्या आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी असल्याचे जगताप म्हणाले.
यावर्षी ५०० कोटींच्या नुकसानीचा अंदाज
चालू वर्षी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पहिला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला असून, प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान जवळपास ५०० कोटी रुपयांचे आहे. “शासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन वेळेत नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक दिलासा मिळेल, हीच माफक अपेक्षा आहे,” असे अनिल जगताप यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.