धाराशिव – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले असून, सोयाबीन, उडीद, मूग यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत सडून जात आहेत. या प्रचंड नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे येत आहेत. मात्र, कृषिमंत्र्यांच्या या दौऱ्याने दिलासा मिळण्याऐवजी, पीकविम्याच्या बदललेल्या जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडली आहे.
कळंब आणि वाशी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेती पावसाच्या पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, रात्रीचा दिवस करून जगवलेली पिके आता मातीमोल झाली आहेत. ‘एन पावसाळ्यात दडी मारली आणि आता काढणीच्या वेळेस पावसाने थैमान घातले, आता आम्ही जगायचं कसं?’ असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, पंचनाम्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
मात्र, या शासकीय दौऱ्यापेक्षाही शेतकऱ्यांची चिंता पीकविम्याच्या बदललेल्या नियमांनी वाढवली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून पीकविमा नियमावलीत मोठे बदल करण्यात आले असून, पूर्वी असलेले तीन महत्त्वाचे ‘ट्रिगर’ काढण्यात आले आहेत. आता केवळ ‘उंबरठा उत्पन्न’ (Threshold Yield) या एकमेव निकषावर नुकसान भरपाई अवलंबून आहे. या नियमानुसार, संपूर्ण महसूल मंडळाचे सरासरी उत्पन्न जर निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी आले, तरच विमा मंजूर होईल.
यातील सर्वात मोठा धोका हा आहे की, एखाद्या शेतकऱ्याचे वैयक्तिक १०० टक्के नुकसान होऊनही, जर संपूर्ण मंडळाची सरासरी जास्त आली, तर त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून कवडीचीही मदत मिळणार नाही. “आमच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलंय, पण मंडळाची सरासरी आमच्या विरोधात गेली तर आम्ही काय करायचं? हा नियम आमच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
त्यामुळे, कृषिमंत्री येत आहेत हे चांगले असले तरी, त्यांनी केवळ पाहणी आणि आश्वासनांवर न थांबता पीकविम्याच्या या जाचक अटीतून शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल, यावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, अस्मानी संकटातून वाचलेला शेतकरी या ‘सुलतानी’ नियमांच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.