धाराशिव : “जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे, शासनाने पंचनाम्यांचे सोपस्कार न करता तात्काळ धाराशिव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत द्यावी,” अशी आग्रही मागणी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली. कृषी मंत्री आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता, संजय पाटील दुधगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या आणि मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावर्षी पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. निवेदनानुसार, ११ मे ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कळंब, वाशी, धाराशिव, भूम आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा खूप जास्त, म्हणजेच जवळपास ६९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, सिना, भोगावती यासह सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, ऊस आणि भाजीपाला पिके पाण्याखाली जाऊन पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या धक्क्याने १०० पेक्षा जास्त जनावरे दगावली असून, मनुष्यहानीच्या घटनाही घडल्या आहेत. नदीकाठच्या हजारो हेक्टर जमिनीचा २ ते ३ फूट सुपीक थर पाण्यासोबत वाहून गेल्याने जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे.
“आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे पार उद्ध्वस्त झाला आहे. पावसाळा अजून संपलेला नाही, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, शासनाने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहोचवावी, तसेच सन २०२४-२०२५ मधील जाहीर केलेली नुकसान भरपाईदेखील त्वरित अदा करावी, अशी प्रमुख मागणी कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.