धाराशिव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने २०२५-२६ या वर्षासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स, चीन आणि दक्षिण कोरिया यांसारख्या कृषीप्रधान देशांना भेट देण्याची संधी मिळेल. या दौऱ्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, सेंद्रिय उत्पादन, जल व्यवस्थापन, दुग्धोत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष अनुभव आणि प्रशिक्षण मिळणार आहे.
निवडीचे निकष आणि आवश्यक अटी:
जिल्ह्यातून एकूण ५ शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून, यामध्ये एक महिला शेतकरी, एक कृषी पुरस्कारप्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन सर्वसाधारण शेतकऱ्यांचा समावेश असेल. या दौऱ्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही प्रमुख अटी निश्चित करण्यात आल्या आहेत:
- अर्जदाराचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदाराकडे वैध पासपोर्ट असणे अनिवार्य आहे.
- शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असावे आणि ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी (Farmer ID) असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि कोरोना संबंधित अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
- अर्जदार सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरीत नसावा, तसेच तो डॉक्टर, वकील, सीए किंवा अभियंता अशा व्यावसायात नसावा.
- यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतून परदेश दौऱ्याचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, शिधापत्रिका यांची छायांकित प्रत आणि स्वयंघोषणापत्र जोडून आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३१ जुलै २०२५ पर्यंत जमा करावे.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.