धाराशिव: महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका दुकानावर अन्न सुरक्षा विभागाने (FDA) छापा टाकला. या कारवाईत १८ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई धाराशिव शहरातील अगड गल्ली येथील ‘अंबिका ट्रेडर्स’ नावाच्या दुकानावर करण्यात आली. दयानंद सुनिल सोनटक्के (वय ३८, रा. अगड गल्ली, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सठवाजी लोंढे (वय ५०) यांनी २२ जुलै रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाला २० जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अंबिका ट्रेडर्समध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने दुकानात तपासणी केली असता, तेथे विक्रीसाठी ठेवलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला असा एकूण १८,४१८ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी दयानंद सोनटक्के यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.