मराठवाड्याच्या कोरडवाहू कपाळावर नियतीने पुन्हा एकदा क्रूरतेचा नांगर फिरवला आहे. धाराशिव, तोच जिल्हा जो देशातील सर्वात मागासलेल्यांच्या यादीत मानाने (!) तिसरा क्रमांक पटकावतो, आज निसर्गाच्या रौद्र रूपात अक्षरशः वाहून गेला आहे. ‘सांगा हा शेतकरी कसा उभा राहील?’ हा प्रश्न आज केवळ एका जिल्ह्याचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या माणुसकीला विचारलेला सवाल आहे.
या जिल्ह्याने काय सोसले नाही? १९७२ चा दुष्काळ पाहिला, जिथे घोटभर पाण्यासाठी माणसे वणवण फिरली आणि गावंच्या गावं ओस पडली. त्यानंतर १९९३ साली भूकंपाने धरती हादरली, सास्तूर – माकणीच्या किंकाळ्यांनी आसमंत फाटला, हजारो जीव गेले, संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पण धाराशिवचा शेतकरी फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याही राखेतून उभा राहिला. जखमा भरल्या, घरं उभी राहिली आणि मोडलेला कणा पुन्हा ताठ झाला.
पण यंदाचा घाव वर्मी बसला आहे. हा ना दुष्काळ आहे, ना भूकंप. ही तर जलप्रलयाची आपत्ती आहे. ज्या पावसासाठी इथला शेतकरी डोळे आकाशाकडे लावून बसतो, त्याच पावसाने आज त्याचे घर, शेत, जनावरं आणि स्वप्नं सगळं काही गिळंकृत केलं आहे. भूम, परंडा, कळंब तालुक्यांत तर आभाळच फाटलं. धरणं, तलाव ओसंडून वाहत आहेत, जणू काही निसर्गानेच शेतकऱ्याच्या विरोधात अघोषित युद्ध पुकारले आहे.
हे नुकसान केवळ पिकांचे नाही. पिकांसोबत शेतच वाहून गेले आहे. काळी आई, जिच्या जीवावर पिढ्यानपिढ्या पोसल्या गेल्या, तीच माती डोळ्यादेखत ओघळून गेली. शेतात मोठमोठे खड्डे पडले आहेत, जणू काही भूगोलच बदलून गेला आहे. पूल, रस्ते वाहून गेले, संपर्क तुटला आणि माणूस बेटावर अडकल्यासारखा हतबल झाला आहे. हेलिकॉप्टरने जीव वाचवले, पण जगण्याचं काय? जनावरं मेली, घरं पडली, आणि उरलाय तो फक्त डोळ्यांतला पूर आणि काळजातला आक्रोश.
नेत्यांचे दौरे झाले, कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले, आश्वासनांची पेरणी झाली. उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांनी ‘पर्यटन’ पूर्ण केले. पण आता शब्दांची नाही, तर ठोस मदतीची गरज आहे. ही वेळ केवळ पंचनाम्यांची आणि कोरड्या सहानुभूतीची नाही.
सरकारने आता कोणताही मुलाहिजा न ठेवता ‘ओला दुष्काळ’ जाहीर करायला हवा. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं तात्काळ उतरवलं पाहिजे. तुटपुंजी नव्हे, तर हेक्टरी किमान २० हजार रुपयांची थेट मदत त्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे. आणि पीक विम्याच्या नावाखाली सुरू असलेली टोलवाटोलवी थांबवून, त्याला त्याच्या हक्काचा विमा मिळायलाच हवा.
धाराशिवचा शेतकरी आजवर अनेक संकटांशी लढला आणि जिंकला. पण यावेळची लढाई एकट्याची नाही. त्याच्या पाठीवर मायेचा हात आणि खात्यात मदतीचा आकडा दिसला, तरच तो पुन्हा उभा राहील. नाहीतर, मराठवाड्याच्या या काळ्या मातीत, शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त स्वप्नांची एक नवी, काळी कहाणी लिहिली जाईल, जी पुसायला कदाचित अनेक दशकं लागतील. सरकारने आता ठरवायचे आहे: या कहाणीचे लेखक व्हायचे की उद्धारकर्ते?
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह