निसर्गाचा कोप काय असतो, याचा भयाण अनुभव सध्या धाराशिव जिल्हा घेत आहे. परंडा, भूम, वाशी, कळंब तालुक्यांवर आभाळ अक्षरशः फाटले. ढगफुटीसदृश पावसाने नद्या-नाल्यांना राक्षसी रूप दिले आणि पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले. यापूर्वी जिल्ह्याच्या इतर तालुक्यांना पावसाने झोडपले होतेच, पण परंडा आणि भूम तालुक्यात तर प्रलयाचे तांडवच पाहायला मिळाले. गावेच्या गावे पाण्याखाली गेली, माणसे आणि जनावरे पुरात अडकली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्यांना पाचारण करावे लागले. लाखी, कपिलापुरी, वडनेर, देवगाव आणि विशेषतः वाघेगव्हाणसारख्या अनेक गावांमधून शेकडो नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले. बचाव पथकांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, पण त्यांनी वाचवलेले जीव आता उघड्यावर पडलेला आपला उद्ध्वस्त संसार पाहून हताश झाले आहेत.
पूर ओसरला आहे, पण मागे जे काही शिल्लक आहे ते वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच वाहून गेली आहे. सुपीक शेतांचे रूपांतर आता खड्ड्यांच्या आणि दगडांच्या भयाण वास्तवात झाले आहे. अनेकांचे संसार डोळ्यादेखत वाहून गेले. घरातले सामान, धान्य आणि आयुष्यभराची जमापुंजी चिखलात रुतून बसली आहे. ज्या पशुधनावर शेतकऱ्याचा जीव अवलंबून होता, त्या गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा आक्रोश आता पाण्याच्या आवाजात विरून गेला आहे. सगळीकडे एकच आर्त किंकाळी ऐकू येत आहे – ‘आमचं काय चुकलं?’ या नैसर्गिक आपत्तीने इथल्या माणसाला अक्षरशः रस्त्यावर आणले आहे.
अशा गंभीर परिस्थितीत, सरकारी यंत्रणा हलली. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह पूरग्रस्त भागाचा ‘धावता’ दौरा केला. हेलिकॉप्टर आले, गाड्यांचा ताफा आला, अधिकाऱ्यांची धावपळ झाली, कॅमेरे चमकले आणि नेतेमंडळींनी परिस्थितीची पाहणी केली. हे आवश्यक आहे, पण आता या दौऱ्यांचे रूपांतर ठोस मदतीत व्हायला हवे. लोकांच्या डोळ्यांतील पाणी आता कोरडे झाले आहे, त्यांच्या अपेक्षा मात्र कायम आहेत. ‘सरकार आले, आता मदत मिळेल’ ही एकच भाबडी आशा त्यांना जगवत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे आणि ती पूर्णपणे रास्त आहे. केवळ पंचनामे आणि कागदी घोडे नाचवून काहीही साध्य होणार नाही. ज्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेली, त्याला तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. ज्यांचे घर पडले, त्यांना निवार्याची आवश्यकता आहे. ज्यांची जनावरे वाहून गेली, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधाराची गरज आहे. सरकारी दौरे हे केवळ आश्वासनांचे सोपस्कार ठरू नयेत. आता गरज आहे ती थेट आणि परिणामकारक मदतीची. पंचनामे तातडीने, प्रामाणिकपणे आणि कोणताही राजकीय दबाव न ठेवता व्हायला हवेत. मदत थेट नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.
धारशिव जिल्हा आज मोठ्या संकटात आहे. निसर्गाने घाव घातला आहे, आता त्यावर फुंकर घालण्याची जबाबदारी शासनाची आहे. केवळ दौऱ्यांनी आणि पोकळ शब्दांनी लोकांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. त्यासाठी संवेदनशील मनाने आणि खंबीर कृतीने त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. सरकारने दाखवलेली तत्परता जर मदतीच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचली, तरच या उद्ध्वस्त झालेल्या संसारांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळेल. अन्यथा, हे दौरे केवळ ‘राजकीय पर्यटन’ ठरतील आणि धारशिवच्या डोळ्यांतील पाणी कधीच सुकणार नाही.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह