धाराशिव: धाराशिव जिल्ह्याच्या अनेक भागांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः वाशी आणि कळंब तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा आणि मांजरा नद्यांना पूर आला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील माती खरवडून गेली आहे, विहिरी गाळाने भरल्या आहेत आणि सिंचनासाठीचे ड्रीपसेट वाहून गेले आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
या अभूतपूर्व पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कळंब तालुक्यातील इटकूर परिसरात गेल्या चाळीस वर्षांत इतका पाऊस झाला नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. गावातील पुलावरून जवळपास पाच तास पाणी वाहत असल्याने परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठची उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
खोंदला गावात एकाचा शोध सुरू
कळंब तालुक्यातील खोंदला गावात पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक दाखल झाले असून, बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.
धरणे तुडुंब, धोका वाढला
जिल्ह्यातील तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे, तर मांजरा धरणात पाण्याची वेगाने आवक सुरू आहे. बहुतांश बंधारे आणि साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हवामान खात्याने पुढील दोन-तीन दिवस आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भरलेल्या धरणांमुळे आणि आगामी पावसामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या, जमिनीच्या नुकसानीची तसेच दगावलेल्या जनावरांची माहिती तातडीने संबंधित तलाठी कार्यालयात नोंदवावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.