धाराशिव – सध्या सणासुदीचे दिवस असल्याने दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन, फरसाण, खाद्यतेल, वनस्पती, तुप, आटा, रवा, मैदा, बेसन, ड्रायफ्रुट, चॉकलेटस व तत्सम अन्न पदार्थाची मागणी जास्त असते. काही असामाजिक तत्वे अशा परिस्थीतीत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून किंवा अस्वच्छ,अनारोग्यकारक वातावरणात अन्न पदार्थांचे उत्पादन करून विक्री करण्याची दाट शक्यता आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकाना भेसळमुक्त, शुद्ध, ताजे व उत्तम प्रतीचे अन्न पदार्थ, मिठाई मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, या कार्यालयाने सणासुदीच्या काळात तेल, दुध, मिठाई, पेढा, रवा, मैदा, खवा व इतर अन्न पदार्थ असे एकूण 85 अन्न पदार्थाचे नमुने चाचणी व विश्लेषणासाठी घेतले आहे.
अन्न व औषध प्रशासन या कार्यालयामार्फत एका उत्पादकाकडे तपासणी करून विना परवाना उत्पादित करीत असलेला खवा या अन्नपदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन भेसळीच्या संशयावरून उर्वरीत साठा अंदाजे 109 किलो किंमत 26 हजार 160/- साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्न पदार्थाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये कारवाई घेण्यात येईल.
जिल्ह्यातील नागरिकांनी अन्न पदार्थाबाबत काही तक्रार / जिल्ह्यात कोठेही अन्न पदार्थामध्ये भेसळ होत असल्यास या कार्यालयास किंवा टोल फ्री क्रमांक-१८००२२२३६५ येथे तक्रार नोंदवावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन (म.राज्य),यांनी कळविले आहे.