धाराशिव: शहरातील कचरा डेपोचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, याला उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचा नाकर्तेपणा आणि दुर्लक्ष जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी (भाजप) युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. तसेच, भाजप आणि भाजयुमोने केलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनांमुळेच हा प्रश्न आता मार्गी लागण्याची खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, भाजप व भाजयुमोने १६ डिसेंबर २०२१ पासून कचरा डेपोच्या समस्येवर आंदोलनांची मालिका सुरू केली होती. नगर परिषदेमध्ये कचरा डेपोच्या आडून आर्थिक अपहार होत असल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणी तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने वेळोवेळी केली. यासाठी नगर परिषदेसमोर कचऱ्याची होळी करणे, जोरदार घोषणाबाजी करणे यांसारखी आंदोलने करण्यात आली.
राजेनिंबाळकर यांनी उबाठा गटावर टीका करताना म्हटले आहे की, जेव्हा ते सत्तेत होते, तेव्हा त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि रस्ते, भुयारी गटारं यांसारख्या कामांमधील टक्केवारीमध्ये ते व्यस्त राहिले. विशेष म्हणजे, त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शहराच्या विकासाचे प्रश्न दुर्लक्षितच राहिले. आता मात्र, भाजपच्या प्रयत्नांमुळे प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत असताना उबाठा गट श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, हा त्यांचा निर्लज्जपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उबाठा गटाच्या दुटप्पी धोरणांमुळे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत आणि आणखी कार्यकर्ते येण्याच्या मार्गावर आहेत, असा दावाही या पत्रकात करण्यात आला आहे. आमदार राणादादा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात सुरू असलेला विकासाचा रथ कोणीही अडवू शकणार नाही, असा विश्वासही राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे आणि पाठपुराव्यामुळे कचरा डेपोचा प्रश्न लवकरच कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी खात्री भाजप युवा मोर्चाने व्यक्त केली आहे.