धाराशिव: माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका नर्तिकेच्या घरासमोर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य आणि सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेले अवैध धंदे आणि अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ज्या ‘तुळजाई सांस्कृतिक लोककलानाट्य केंद्रा’तील नर्तिकेमुळे ही घटना घडली, त्या केंद्रावर गंभीर अनियमितता आढळल्याने तहसीलदारांनी परवाना रद्द करूनही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती दिल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
निलंबन कारवाईचा फार्स आणि संशयास्पद स्थगिती
वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क) येथील तुळजाई कला केंद्रात गोविंद बर्गे यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाडसोबत झाली होती. याच केंद्रावर फेब्रुवारी २०२५ मध्ये वाशी पोलिसांनी केलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या होत्या.
- पारंपारिक वाद्यांऐवजी डीजेचा दणदणाट
- निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ कार्यक्रमाच्या नावाखाली धांगडधिंगा
- बेकायदेशीर दारू विक्री आणि महिलांचे अश्लील नृत्य
या स्पष्ट अहवालानंतर वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी १७ जून २०२५ रोजी या केंद्राचा परवाना रद्द केला. मात्र, केंद्राच्या मालकीन विजया अंधारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपील करताच, अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केवळ काही दिवसांतच या निलंबन आदेशाला स्थगिती दिली आणि नव्याने तपासणीचे आदेश दिले. पोलिसांचा स्वयंस्पष्ट अहवाल असतानाही ही स्थगिती का देण्यात आली, यावरून प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
एकाच वेळी दोन पथके, तपासणी की तडजोड?
वरिष्ठ कार्यालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर हे केंद्र पुन्हा जोमात सुरू झाले. या केंद्राची फेरतपासणी करण्यासाठी जेव्हा तहसीलदारांचे पथक गेले, तेव्हा तिथे आधीच पोलीस दलाचे दामिनी पथक तपासणी करत असल्याचे आढळून आले. एकाच वेळी दोन पथकांच्या उपस्थितीमुळे केंद्रातील सर्व गैरप्रकार तातडीने गुंडाळण्यात आले आणि तहसीलच्या पथकाच्या हाती अतिक्रमणाव्यतिरिक्त काहीही लागले नाही. ही तपासणी म्हणजे केवळ एक फार्स होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रांचे वाढते लोण आणि गुन्हेगारी
धाराशिव जिल्ह्यात सध्या देवी-देवतांच्या नावाने (उदा. तुळजाई,कालिका, महाकाली) अनेक कला केंद्रे सुरू असून, अनेक केंद्रे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. ही केंद्रे संस्कृतीच्या नावाखालील गुन्हेगारीचे अड्डे बनू लागली आहेत. महिनाभरापूर्वीच, ५ ऑगस्ट रोजी कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य केंद्रात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि गोळीबार करण्यात आला होता, ज्यात एक जण जखमी झाला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी, ठोस कारवाई झालेली नाही.
या घटनांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पिंपळगाव येथील महिलांनी तुळजाई कला केंद्राला तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व प्रकारांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ही तथाकथित ‘कला केंद्रे’ तात्काळ बंद करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुख्य मुद्दे:
- माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील लोकनाट्य कलाकेंद्रांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर.
- वाशी तहसीलदारांनी निलंबित केलेल्या वादग्रस्त तुळजाई कलाकेंद्राला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्थगिती, निर्णयावर संशयाचे सावट.
- चोराखळी येथील महाकाली कलाकेंद्रात गोळीबार होऊनही कारवाई थंड बस्त्यात, जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. उमरगा येथील एका तरुणाच्या खून प्रकरणी महाकाली कला केंद्रातील तीन महिला अटक
- स्थानिक महिलांचा कलाकेंद्रांना तीव्र विरोध, सर्व केंद्रे बंद करण्याची जोरदार मागणी.