धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव शहरातील शम्स चौक येथे छापा टाकून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५१,१८५ रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यातआले असून, आरोपी सलमान गुलाम शेख (वय २५, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने तपास मोहीम राबवली.
गुप्त माहितीवरून छापा
धाराशिव शहरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शम्स चौकातील एका गाळ्यात आरोपी सलमान शेख महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून विक्री करत आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या समक्ष छापा टाकला.
५१ हजारांचा गुटखा जप्त
छाप्यात सितार गुटखा, बादशाहा गुटखा, आरसीबी, आरएमडी पान मसाला, माणिकचंद गुटखा, एम गोल्ड तंबाखू, जाफरानी जर्दा, रोयल ७१७ आणि एक्स्ट्रा तंबाखू यासह रत्ना छाप तंबाखूच्या १८१ डब्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत ५१,१८५ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी सलमान शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा गु.र.नं. ११५/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम २२३, २७५, १२३ तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.