धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांच्या सुट्टीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना एकसमान सुट्टी जाहीर न करता, परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर सुट्टीचा निर्णय घेण्याचे अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना देण्यात आले आहेत.
शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धाराशिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य स्थिती आहे, तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. या विषम परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, ज्या गावांमध्ये अतिवृष्टी, पूर किंवा इतर कोणतीही धोकादायक स्थिती निर्माण झाली असेल, तेथे मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीशी विचारविनिमय करून सुट्टीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सुट्टी जाहीर केल्यास पालकांना आणि प्रशासनाला कळवणे बंधनकारक
ज्या शाळा स्थानिक पातळीवर सुट्टीचा निर्णय घेतील, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सुट्टीची माहिती तात्काळ विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावी, असे स्पष्ट निर्देश परिपत्रकात आहेत. तसेच, घेतलेल्या सुट्टीची माहिती संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला त्वरित कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनावश्यक सुट्ट्या टाळण्याचे आवाहन
या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने दक्षता घेतली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा अनावश्यक सुट्टी घेणार नाहीत, याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेतला जाणार आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी नागेश मापारी आणि सुधा साळुंके यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.