धाराशिव: येथील प्रसिद्ध भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागेश विकास मडके (वय ३३) हे वडगाव शिवारातील हॉटेल भाग्यश्री येथे काम करत असताना, एका पांढऱ्या-निळ्या रंगाच्या एर्टिगा गाडीतून आलेल्या सहा व्यक्तींनी त्यांना फोटो काढण्याच्या बहाण्याने गाडीजवळ बोलावले. त्यानंतर, आरोपींनी मडके यांचे दोन्ही हात गाडीच्या काचेत अडकवून त्यांना फरफटत नेले, शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
या हल्ल्यादरम्यान आरोपींनी मडके यांच्या कपाळावर बंदूक ठेवून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत मडके गंभीर जखमी झाले. आरोपींनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली.
या घटनेनंतर नागेश मडके यांनी २६ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९, ११५(२), ११९(१), ३५२, ३५१(२) आणि शस्त्र अधिनियम कलम ३(५), ३, २५ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि ५ आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.