धाराशिव: घरात साफसफाईच्या कामासाठी ठेवलेल्या दोन महिलांनीच मालकिणीचा विश्वासघात करत घरातील तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धाराशिव शहरातील शंकर नगर परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी प्रसाद धर्म (वय ४०, रा. साधक चाईल्ड केअरच्यावर, शंकर नगर, धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरी कमल काशिनाथ चव्हाण आणि बबिता काशिनाथ चव्हाण (दोघी रा. मुक्तेश्वर कॉलनी, धाराशिव) या साफसफाईचे काम करत होत्या. फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवून घराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आरोपी महिलांनी घरात कोणी नसताना संधी साधून घरातील १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हळूहळू लंपास केले. या दागिन्यांची एकूण किंमत ४,५०,००० रुपये इतकी आहे.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अश्विनी धर्म यांनी २० सप्टेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कमल चव्हाण आणि बबिता चव्हाण या दोघींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे घरात अनोळखी व्यक्तींना कामावर ठेवताना अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.