धाराशिव : शहरातील साईराम नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकूण ८३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी परमेश्वर शिवाजी राठोड (वय २४, रा. घाटंग्री, ह.मु. साईराम नगर, धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर राठोड हे साईराम नगरातील रविशंकर शाळेच्या पाठीमागे राहतात. २५ जुलै रोजी पहाटे २:०० ते सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ८३,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
घटनेच्या पाच दिवसांनंतर, ३० जुलै रोजी परमेश्वर राठोड यांनी धाराशिव शहर पोलिसांत रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४) आणि ३०५ अन्वये घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.