धाराशिव – पत्नीचे खाजगी फोटो तिच्या भावाला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार येडशी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला शिवीगाळ आणि मारहाणही केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी संगिता उत्तम शिंदे (वय ३२ वर्षे, सध्या रा. येडशी, ता. जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती उत्तम ताय्याण्णा शिंदे (रा. विजयवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तम शिंदे याने दि. २३ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संगिता यांचे भाऊ सागर काळे यांच्या मोबाईलवर संगिता यांचे फोटो आणि एक गुगल पे स्कॅनर पाठवले. “या स्कॅनरवर पैसे पाठव, नाहीतर तुझ्या बहिणीचे फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी केली.
याशिवाय, आरोपी उत्तम हा पत्नी संगिता यांना सातत्याने शिवीगाळ करून मारहाण करत होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या छळाला कंटाळून संगिता शिंदे यांनी अखेर दि. २५ जुलै २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उत्तम शिंदे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ११५(२), ३५२, ३५१(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.