मुरूम : येथील एका अडीच वर्षांच्या बालकाच्या बेकायदेशीर दत्तक प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आणि आपल्याला रात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, सरकारी वकिलांच्या सल्ल्यानेच पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
मुरूम येथील शुभम अमोल तळभंडारे (वय २ वर्षे ६ महिने) या बालकाचे बेकायदेशीर दत्तकविधान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल आणि बालकाचे नातेवाईक मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गेले होते.
सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या म्हणण्यानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपान दहिफळे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. याचा जाब विचारला असता, पोलिसांनी अरेरावी करत बाळाच्या आजीसह चौघांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. “महिलांना रात्री पोलिस ठाण्यात ठेवता येत नाही, आम्ही याप्रकरणी रीतसर तक्रार करणार आहोत,” असे सौंदरमल यांनी सांगितले.
पोलिसांची भूमिका:
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपान दहिफळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चौघेजण आले होते, परंतु आम्ही कोणालाही डांबून ठेवले नाही किंवा धक्काबुक्की केली नाही,” असे दहिफळे यांनी स्पष्ट केले. बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असले तरी, जिल्हा सरकारी अभियोक्ता यांच्याकडून कायदेशीर मार्गदर्शन मागवून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, बालकाच्या आईचा जबाब महत्त्वाचा असून, ती अद्याप पोलिस ठाण्यात हजर झालेली नाही, तिच्या जबाबनंतरच प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.
कायदेशीर प्रक्रिया काय सांगते?
या प्रकरणी कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, दत्तकविधानासाठी जिल्हा न्यायाधीशांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. या प्रकरणात १ जुलै २०२५ रोजी करारनामा झाल्याचे दिसत असून, यानंतर वीस दिवसांत दत्तकविधानाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. जर प्रक्रिया सुरू केली नसेल तर या प्रकरणाचा तपास गंभीरपणे व्हायला हवा. तसेच, दत्तकविधानासाठी आईची संमती असल्यास इतर नातेवाईकांच्या संमतीची आवश्यकता नसते.