बेंबळी : कत्तलीच्या उद्देशाने पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांना बेंबळी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रविवारी (दि. २२) दुपारी करजखेडा-तुळजापूर हायवेवर ताकविकी शिवारात करण्यात आली. पोलिसांनी वाहनासह ३५ हजार रुपये किमतीची तीन जनावरे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बशीर चाँद कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग) आणि महेश विजय सोनटक्के (रा. खंडाळा, ता. तुळजापूर) हे दोघे पिकअप (क्र. एमएच ४२ एक्यु ०५४५) मधून जनावरे घेऊन जात होते. करजखेडा-तुळजापूर हायवेवरील सह्याद्री हॉटेलजवळ पोलिसांना हा पिकअप संशयास्पदरीत्या आढळून आला.
वाहनाची तपासणी केली असता, त्यात दोन गायी आणि एक खोंड असे एकूण तीन गोवंशीय जनावरे चारा-पाण्याची सोय न करता अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवल्याचे दिसले. चौकशीत ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी बेंबळी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमांनुसार (कलम ५(अ)(१), ५(ब), ९ आणि ११(१)(घ)(ड)(ट)) गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.