धाराशिव: महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तत्सम पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. गोरख महादेव निंबाळकर असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल ८२,६६९ रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास येडशी येथील पवार कॉलनी परिसरात करण्यात आली. आरोपी गोरख महादेव निंबाळकर (वय ५०, रा. गुसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, ह.मु. पवार कॉलनी, येडशी) हा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे धाराशिव ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून निंबाळकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८२,६६९ रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी, आरोपी गोरख निंबाळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.