धाराशिव: शहरालगत असलेल्या जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादात जेसीबीच्या सहाय्याने बोर्डाची मोडतोड करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांसह अन्य अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एहतेशाम अतीख अहमद शेख (वय ३८, रा. खाजा नगर, धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांनी त्यांची व इतर दोघांची मिळून धाराशिव-वैराग रोड लगतच्या सर्व्हे गट क्रमांक ६८८/३ मध्ये साडेपाच एकर जमीन सामायिकरित्या घेतली आहे.
सोमवार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता शेख यांना त्यांच्या भावाने फोन करून सांगितले की, त्यांच्या शेतात काही लोक जेसीबी घेऊन आले आहेत. माहिती मिळताच शेख, त्यांचे मामा निजाम शेख आणि भागीदार जावेद अहमद पाशा मणियार घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना गणेश मच्छिंद्र माळी (रा. तांबरी विभाग, धाराशिव), जमील सय्यद, इरफान कुरेशी, आतिक कुरेशी, खालेद कुरेशी (सर्व रा. खिरणी मळा, धारशिव) आणि इतर पाच अनोळखी इसम जेसीबीसह दिसले.
“तुम्ही आमच्या शेतात काय करत आहात,” असे शेख यांनी विचारले असता, आरोपी खालेद कुरेशी याने “ही शेती आम्ही गणेश मच्छिंद्र माळी यांच्याकडून इसारपावती करून घेतली आहे,” असे उत्तर दिले. त्यावर शेख यांनी आपली जमीन गट क्रमांक ६८८/३ मध्ये असून माळी यांची जमीन रस्त्याच्या पलीकडे ६८८/१ मध्ये असल्याचे सांगितले.
यानंतर, जमील सय्यद याने ‘गणेश माळी यांनी हीच जमीन आम्हाला विकली आहे’ असे म्हणत जेसीबीने शेतातील नावाचा बोर्ड उकरून त्याची मोडतोड केली. शेख यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, जमील सय्यद, इरफान कुरेशी, आतिक कुरेशी, खालेद कुरेशी आणि त्यांच्यासोबतच्या इतर लोकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि “तू या शेतात कसा येतो ते बघतो,” अशी धमकी दिली.
या घटनेनंतर एहतेशाम शेख यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश माळी, जमील सय्यद, इरफान कुरेशी, आतिक कुरेशी, खालेद कुरेशी आणि इतर पाच अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) (अतिक्रमण), १८९(२) आणि १९० (बेकायदेशीर जमाव), ३२४(२) (नुकसान करणे), ३५२ (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूने अपमान करणे) आणि ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.