धाराशिव: उसने घेतलेल्या पैशांवर फिर्यादीने जास्त व्याजाची मागणी केल्याचा राग मनात धरून, तरुणांनी चक्क फिर्यादीच्याच घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) वेगाने तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव शहरातील कुरणेनगर भागात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (गुरनं ५७०/२०२५, कलम ३३१(४), ३०५(A) बीएनएस) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आणि शहरात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली.
सदर गुन्हा स्वप्नील सतीष जेटीथोर, श्वेत सुनिल चिलवंत आणि निखील किरण सोनवणे (सर्व रा. धाराशिव) या तिघांनी मिळून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना धाराशिव शहरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता, गुन्ह्यामागचे मुख्य कारण समोर आले. या गुन्ह्यातील फिर्यादी शुद्धोधन गायकवाड यांनी आरोपींना काही पैसे उसने दिले होते. मात्र, त्या बदल्यात गायकवाड हे आरोपींकडून प्रचंड व्याज वसूल करत होते. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि व्याजाच्या जाचाला कंटाळून आरोपींनी संगनमत केले व फिर्यादीच्या कुरणेनगर येथील घरात चोरी केली.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७९,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशान्वये करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब आणि रोहीत दंडनाईक यांचा समावेश होता.






