धाराशिव: जिल्ह्यातील किनी येथील एका धान्याच्या गोडाऊनचे शटर तोडून हजारो किलो हरभरा चोरून नेणाऱ्या टोळीतील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. गौस वहीद पठाण (वय ५०, रा. एकता नगर, धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक दिनांक २३ ऑगस्ट रोजी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गौस पठाण याच्याकडे चोरीचा हरभरा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून गौस पठाण याला त्याच्या अशोक लेलँड वाहनासह ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मौजे किनी येथील ‘विनायक ॲग्रो’ या गोडाऊनचे शटर तोडून हरभऱ्याचे कट्टे चोरल्याची कबुली दिली. या चोरीप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा (गुर नं २३५/२५) दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली.
चोरलेला माल धाराशिव येथील अडत लाईनमध्ये विकल्याचे त्याने सांगितल्यावर पोलिसांनी तात्काळ मालाचा शोध घेतला. यावेळी २,५५९ किलो वजनाचे हरभऱ्याचे ४३ कट्टे आणि गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख २९ हजार रुपये आहे. आरोपीने त्याच्या इतर साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी गौस पठाण याला पुढील कारवाईसाठी ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.