धाराशिव: तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी बनवण्यात आलेले ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शंकर ठुबे यांनी हा निर्णय दिला. राजकीय दबावातून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद ढेपे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला.
काय आहे प्रकरण?
सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्यावर विशाल छत्रे यांनी ६ मे रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३५, ३३६, ३३७, ३४९, ३४० अन्वये गुन्हा दाखल केला होता. माने यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खोटा जबाब तयार करून तो प्रसिद्धीस दिला, ज्यामुळे आपली बदनामी झाली, असे छत्रे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात काही व्हॉट्सॲप ग्रुप्ससह ‘धाराशिव लाइव्ह’ या वेबपोर्टलचा उल्लेख करण्यात आला होता.
याच प्रकरणात राजाभाऊ माने यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने यापूर्वीच दिलासा दिला आहे. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना सुरुवातीला साक्षीदार आणि नंतर सहआरोपी म्हणून नोटीस बजावली. एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून हा त्रास दिला जात असल्याचा आरोप ढेपे यांनी केला आहे.
न्यायालयातील युक्तिवाद आणि निकाल
पोलिसांच्या या कारवाईविरोधात सुनील ढेपे यांनी ॲड. अमोल वरुडकर यांच्यामार्फत धाराशिव जिल्हा न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शंकर ठुबे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत ॲड. वरुडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. “सुनील ढेपे यांनी केवळ आलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून बातमी प्रसिद्ध केली आहे. ड्रग्ज प्रकरणी आवाज उठवल्यामुळेच राजकीय दबावाखाली पोलिसांनी त्यांना आरोपी केले आहे,” असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत सुनील ढेपे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
“सत्याचा विजय झाला” – सुनील ढेपे
न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनील ढेपे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. आलेल्या प्रेस नोटवरून सत्य बातमी प्रसिद्ध केली असताना, पोलिसांनी एका राजकीय नेत्याचे बाहुले बनून त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस सत्याचाच विजय झाला आहे.”