धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील बराच काळ प्रलंबित असलेल्या आठ नगरपालिका आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित होत्या. मुदत संपल्यापासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट (Administrative Rule) लागू होती.
आता ही दीर्घ प्रतीक्षा संपली असून, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) याची घोषणा केली आहे. यामध्ये धाराशिव, तुळजापूर, उमरगा, नळदुर्ग, मुरूम, भूम, परांडा, कळंब या आठ नगरपालिका आणि लोहारा, वाशी या दोन नगर पंचायतींचा समावेश आहे.येत्या २ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र (Nomination Forms) दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, या सर्व नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम एका दृष्टिक्षेपात:
- नामनिर्देशन पत्र दाखल करणे: १० नोव्हेंबर पासून
- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस: १७ नोव्हेंबर
- अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
- निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
- मतदान: २ डिसेंबर
- मतमोजणी: ३ डिसेंबर





